शिक्षणतज्ज्ञ कै. एच. डी. गांवकर (एक प्रवास कधीही न संपणारा)

 

 शिक्षणतज्ज्ञ कै. एच. डी. गांवकर

(एक प्रवास कधीही न संपणारा)

श्री. हरी धर्माजी गांवकर (एच. डी. गांवकर) यांचा जन्म अशा कुटुंबात झाला कि ज्यांनी आपल्या आयुष्यात चांगली मूल्ये व तत्त्वे दिली. धार्मिक संगोपन,चांगले मित्र आणि वाचनाची आवड यामुळे त्याच्या आयुष्यातल्या हजारो मुलांना मोलाचे शिक्षण देण्याची प्रेरणा मिळाली.

श्री. हरी धर्माजी गांवकर यांचा जन्म ३० जून,१९१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील वायरी येथे झाला. ते मुंबईत १९३७ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेला बसले होते. एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी प्रथम विभागात पदवी पूर्ण केली. त्यांनी एम.एस्सी. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे केमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली.

डॉ. रा. का. शिरोडकर यांनी १९३९ मध्ये के.एम.एस शैक्षणिक संस्था स्थापन केली होती आणि आपले कार्य पुढे नेणारे उत्तराधिकाऱ्याच्या शोधत होते. डॉ. शिरोडकर यांनी एच. डी. गांवकर यांच्या मधील असलेली गुणवत्ता ओळखून संस्थेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.

१९४५ साली एच. डी गांवकर यांचा विवाह मीराबाई नरे म्हणजेच आपल्या मातृतुल्य विजयाताई यांच्या सोबत झाला. गांवकर साहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्यात विजयाताईंनी स्वतःला देखील झोकून दिले.

१९४६ साली डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकरांनी गांवकर साहेबांना टी. डी. करण्यासाठी इंग्लंडला पाठविले व १९४७ साली टी डी करून गांवकर साहेब (लंडन) हुन मायदेशी परत आले. १९४८ साली डॉ. शिरोडकरांच्या मृत्यूनंतर के.एम. एस. शिक्षणसंस्थेची संचालक पदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि ती त्यांनी हि शिक्षणसंथा महाराष्ट्रात नावारूपाला आणली.

१९४९ मध्ये मिठबाव येथील ट्रेनिंग कॉलेज ची स्थापना एच. डी. नी केली. गोवे पोर्तुगीज अमलाखाली असताना येथील मुलांच्या मराठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आगरवाडा येथे प्राथमिक शाळा उघडली.

१९५० ला मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून परळ मतदार संघातून गांवकर साहेब निवडून आले. १९५२ झाली शिक्षणसमितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

१९५२ ला परळ व मिठबाव येथील शाळांचे बांधकाम पुरे केले व १९५३ ला डॉ. शिरोडकर स्मारक मंदिराचे बांधकाम सुरू केले.

१९५४ साली मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याचे चेअरमन म्हणून एच. डी. सरांची निवड करण्यात आली. ते शिक्षण समितीचे चेअरमन असताना त्यांनी प्राथमिक शिक्षणाबाबत संशोधन करण्याची योजना महापालिकेमध्ये मांडली. महापालिकेच्या शाळांची शासन व्यवस्था विकेंद्रीत करण्याची सूचना त्यांनी केली. एच. डी. सरांनी पाचवी, सहावी, सातवी या इयत्ता साठी सामान्य विज्ञान विषयाची पुस्तके लिहिली या पुस्तकांच्या २० आवृत्ती प्रसिद्ध झाल्या.

१९५५ साली मिठबाव येथे ४५ हजार रुपयांचे सर ससून डेव्हिड वसतिगृह उभे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली.

१९५५ साली परळ येथे शिशुविकास मंदिर १९५६ साली परेल प्रायमरी स्कूल ची उभारणी केली. याच सुमाराला डॉ शिरोडकर जनता केंद्राची निर्मिती केली.

१९५७ मध्ये कोकण विकास मंडळाचे कार्याध्यक्ष निवडले गेले. गांवकर साहेब कोकण विकास मंडळाचे एक संस्थापक सदस्य होते.

१९५८ गांवकर साहेबांना जे. पी. व ऑनरेरी प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट बृहन्मुंबई हे किताब देऊन त्यांचा समाजसेवेचा शासनाकडून गौरव करण्यात आला.

१९६२ साली दहा लाख रुपये खर्चाचे डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर परळ मध्ये उभे करून आपल्या गुरुचे मुंबईमध्ये भव्य स्मारक उभे केले.

१९६३ साली भूगोलाचे पुस्तक लिहिण्यासाठी शासनाने एक समिती नेमली या समितीवर गावकर साहेबांना देखील घेण्यात आले.

१९६४ साली भारत सरकारने उत्कृष्ट शिक्षक म्हणून राष्ट्रीय पारितोषिक देऊन त्यांच्या सेवेचा गौरव केला.

१९७० ते १९८० पर्यंत च्या दशकामध्ये गांवकर साहेबांनी विविध समित्यांवर कार्य केले. १९७२ साली महाराष्ट्र फेडरेशनच्या शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याच्या कमिटीचे ते सेक्रेटरी झाले. १९७४ साली कला विभाग शिक्षक संघाचे मुंबई येथे झालेले १२ वे अधिवेशन हे त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याच वर्षी कार्यानुभव संबंधीचे पुस्तक राज्य मंडळासाठी त्यांनी संपादित केले.

१९७५ साली भारतीय शैक्षणिक विश्वस्त संस्थेचे सदस्य आणि सेक्रेटरी झाले. पुणे विभागीय मंडळाच्या परीक्षा कमिटीवर सदस्य म्हणून त्यांना घेण्यात आले.

१९७६ साली डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी या नव्या संस्थेची स्थापना केली डॉ. शिरोडकर शिक्षण संस्थेद्वारे ग्रामीण विकासाचे स्वप्न त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवले. या स्वप्नाला मूर्त रूप देण्याच्या उद्देशाने १९७७ साली त्यांनी वायरी येथे "शिक्षणातील उत्पादन" हा नवा प्रयोग सुरू केला.

 रत्नागिरी जिल्ह्यातील वायरी या गावी १९७९ साली श्री रेकोबा माध्यमिक हायस्कूलची निर्मिती गांवकर साहेबांनी केली. १९८० साली अखिल भारतीय फेडरेशन कानपूर या संघटनेच्या कौन्सिलचे ते सदस्य झाले.

श्री. एच. डी. गांवकर यांच्यामुळे डॉ.शिरोडकर स्मारक मंदिराची उभारणी शक्य झाली. हे बर्‍याच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य केंद्र बनले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नवरात्य निनाद या नाटकीय सोसायटीची आणि डॉ.शिरोडकर स्पोर्ट क्लबची स्थापना केली. राहुट्यांसारखे उपक्रम महाराष्ट्रामध्ये सुरु करणारी एकमेव शिक्षण संस्था म्हणहेच क्षा. म. स. शिक्षण संस्था होय.

गांवकर साहेब हे दिसायला एखाद्या फणसासारखे होते, वरून दिसायला कडक पण आतून गऱ्याप्रमाणे तेवढेच मधुर व ते तेवढेच शिस्तप्रिय होते.

आपले संपूर्ण आयुष्य एच. डी गांवकर साहेबांनी क्षा. म. समाज आणि डॉ. शिरोडकर शिक्षण संस्थेस समर्पित केले. ७ एप्रिल १९९९ साली गांवकर साहेब अनंतात विलीन झाले.

आज मला हा लेख लिहिताना माझ्या डोळ्यासमोरचे गांवकर साहेब आठवले. ज्यांचा सहवास मला लहानपणापासून मिळाला.

अशा या माझ्या समाजपित्याला त्यांच्या १०२ व्या जयंती दिनानिमित्त क्षा. म. समाज व डॉ शिरोडकर शिक्षण संस्थेतर्फे विनम्र अभिवादन...

 

ॲड. भक्ती चंद्रकांत जोगल

             सरचिटणीस 

          क्षा.म.समाज, मुंबई 

1 comment:

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या समाजमाता "कै. विजयाताई गांवकर"

        कै. विजयाताई हरी गांवकर हे एक असं नाव... ज्यांनी आपल्याला आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. त्यांचा ठाम विश्वास होता की...